गुरुवार, 18 सितंबर 2008

कथा म्हणजे

कथा म्हणजे गॊष्ट. आज ही गोष्टीला पूर्वी इतकच महत्व आहे. आज मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत. तरी गोष्टीच वेड कमी झालेल नाही. गोष्ट अबालवृध्दाना आवडते. विविध धर्मग्रंथामध्येही अनेक कथा ठासून भरलेल्या आढळ्तात. प्रवचनकार व किर्तनकार आपल्या प्रवचनातून वा किर्तनातून आपला विचार श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी अनेक कथांचे कथन करीत असतात. एखाद्या व्यक्तिस विशिष्ट घटना, प्रसंग किंवा विचार दुसऱ्यास सांगावयाचा असल्यास "मला तुला एक गोष्ट सांगावयाची आहे" असे म्हणत असतो. दुसराही ती गोष्ट ऎकण्यासाठी उत्सुकतेने कान टवकारतो. खर म्हणजे गोष्ट आपल्या जीवनाशी एकरुप झालेली असते. परंतू अतिपरीचयामुळे आपल गोष्टीच्या किंवा कथेच्या महत्वाकडे दुर्लक्ष झालेल आहे. कथा ही ’गागर में सागर’ सारखीच असते. गोष्ट लहान असो की मोठी ती ऎकणाऱ्यावर परीणाम करीत असते, ऎकणाऱ्याला विचार करायला लावते, ऎकणाऱ्याच मनोरंजनही करीत असते, ऎकणाऱ्यावर नकळ्त संस्कार करीत असते.
साने गुरुजींनी गोष्टीच महत्व ओळखल होत. ते मुलांना गोड गोष्टी सांगत. कथेच्या माध्यमातून मुलांच्या चारित्र्याची घडण व्हावी म्हणून संस्कारदायी कथा सांगत. मुले त्यांच्या भोवती सदा गोळा होत व ते ही मुलांमध्ये रमून जात. साने गुरुजींनी सारे बालवाङमय त्या द्रुष्टीने लिहिले आहे.
मुले म्हणजे देवा घरची फुले, मुले म्हणजे राष्ट्राची मोलाची ठेव. आजची मुले आपल्या राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. आजच्या बालकांवर सुसंस्कार झालेत, त्यांच्यात नितीमूल्ये रुजलीत तरच आपला देश ’महासत्ता’ बनेल. गोष्टी (कथा) आणि अन्य विधायक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याव्दारे बालकांना राष्ट्राचे भावी आदर्श नागरिक बनविता येऊ शकते.
मुलांना बालपणापासूनच गोष्टी ऎकण्याचे वेड असते. गोष्टीसाठी ती मोठ्यांना भंडावून सोडतात. त्यांच्या ठायीच्या ह्या चांगल्या वेडाला संस्काराचे खतपाणी पुरविले पाहिजे. गोष्ट ही वरवर लहान दिसणारी वस्तू असली तरी परिणामाने, प्रभावाने, सामर्थ्याने ती महान आहे. गोष्टीतले हे सामर्थ्य जाणले पाहिजे आणि बालपणाला चांगला आकार देण्यासाठी तिची जोपासना झाली पाहिजे.
मराठी भाषीकांपर्यंत कथेच बालसंस्कारासाठीच महत्व पोहचवाव आणि ’कथामाला’ या बालकांसाठीच्या चळवळीची माहिती पोहचवावी यासाठीच . . . ही धडपड.
मुले म्हणजे देव, मुले म्हणजे देव
मुले आहेत राष्ट्राची मोलाची ठेव.

कोई टिप्पणी नहीं: