शुक्रवार, 26 सितंबर 2008

गुरुवार, 18 सितंबर 2008

कथा म्हणजे

कथा म्हणजे गॊष्ट. आज ही गोष्टीला पूर्वी इतकच महत्व आहे. आज मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत. तरी गोष्टीच वेड कमी झालेल नाही. गोष्ट अबालवृध्दाना आवडते. विविध धर्मग्रंथामध्येही अनेक कथा ठासून भरलेल्या आढळ्तात. प्रवचनकार व किर्तनकार आपल्या प्रवचनातून वा किर्तनातून आपला विचार श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी अनेक कथांचे कथन करीत असतात. एखाद्या व्यक्तिस विशिष्ट घटना, प्रसंग किंवा विचार दुसऱ्यास सांगावयाचा असल्यास "मला तुला एक गोष्ट सांगावयाची आहे" असे म्हणत असतो. दुसराही ती गोष्ट ऎकण्यासाठी उत्सुकतेने कान टवकारतो. खर म्हणजे गोष्ट आपल्या जीवनाशी एकरुप झालेली असते. परंतू अतिपरीचयामुळे आपल गोष्टीच्या किंवा कथेच्या महत्वाकडे दुर्लक्ष झालेल आहे. कथा ही ’गागर में सागर’ सारखीच असते. गोष्ट लहान असो की मोठी ती ऎकणाऱ्यावर परीणाम करीत असते, ऎकणाऱ्याला विचार करायला लावते, ऎकणाऱ्याच मनोरंजनही करीत असते, ऎकणाऱ्यावर नकळ्त संस्कार करीत असते.
साने गुरुजींनी गोष्टीच महत्व ओळखल होत. ते मुलांना गोड गोष्टी सांगत. कथेच्या माध्यमातून मुलांच्या चारित्र्याची घडण व्हावी म्हणून संस्कारदायी कथा सांगत. मुले त्यांच्या भोवती सदा गोळा होत व ते ही मुलांमध्ये रमून जात. साने गुरुजींनी सारे बालवाङमय त्या द्रुष्टीने लिहिले आहे.
मुले म्हणजे देवा घरची फुले, मुले म्हणजे राष्ट्राची मोलाची ठेव. आजची मुले आपल्या राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. आजच्या बालकांवर सुसंस्कार झालेत, त्यांच्यात नितीमूल्ये रुजलीत तरच आपला देश ’महासत्ता’ बनेल. गोष्टी (कथा) आणि अन्य विधायक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याव्दारे बालकांना राष्ट्राचे भावी आदर्श नागरिक बनविता येऊ शकते.
मुलांना बालपणापासूनच गोष्टी ऎकण्याचे वेड असते. गोष्टीसाठी ती मोठ्यांना भंडावून सोडतात. त्यांच्या ठायीच्या ह्या चांगल्या वेडाला संस्काराचे खतपाणी पुरविले पाहिजे. गोष्ट ही वरवर लहान दिसणारी वस्तू असली तरी परिणामाने, प्रभावाने, सामर्थ्याने ती महान आहे. गोष्टीतले हे सामर्थ्य जाणले पाहिजे आणि बालपणाला चांगला आकार देण्यासाठी तिची जोपासना झाली पाहिजे.
मराठी भाषीकांपर्यंत कथेच बालसंस्कारासाठीच महत्व पोहचवाव आणि ’कथामाला’ या बालकांसाठीच्या चळवळीची माहिती पोहचवावी यासाठीच . . . ही धडपड.
मुले म्हणजे देव, मुले म्हणजे देव
मुले आहेत राष्ट्राची मोलाची ठेव.

रविवार, 14 सितंबर 2008

तरुण पिढी व भोगवाद

तरुण पिढीला हिंसाचार व भोगवादापासून वाचवा !
गेल्या काही दिवसात शाळेतल्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्याचा खून करण्याच्या अनेक घटना घडल्याचे वाचनात आले. शाळकरी मुलांपर्यंत हिंसाचाराचे लोण पोहोचणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. तसेच वर्ष अखेरचे निमीत्त साधून ३१ डिसेंबरला दारु पिऊन वाहने बेफाम चालवणे व तरुणींचा विनयभंग करणे, एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून करणे आदि प्रकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हिंसाचार व भोगवादी प्रवृत्ती तरुण पिढीत शिरली तर संबंध राष्ट्राचे भवितव्य धोक्यात येईल.
आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करुन राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ही भूमिका पार पाडण्यासाठी शरीर, मन आणि बुध्दीला चांगले वळण देण्याच्या वयात आपली तरुण व बालकुमारांची पिढी बेफाट भोगलालसेच्या व हिंसाचाराच्या आहारी जात आहे. ही चिंताजनक प्रवृत्ती आहे.
शांततेच्या मार्गाने समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याची व सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरीकांनी वेळीच सावध होऊन नव्या पिढीमध्ये होऊ लागलेली हिंसाचाराची व चंगळवादाची लागण थांबवण्यासाठी निर्धारपूर्वक पावले उचलली पाहिजेत.
तरुण पिढी हिंसाचार व भोगवादापासून वाचवण्यासाठी - हे करा.
१. पालकांनी / शिक्षकांनी मुला-मुलींशी मोकळा संवाद वाढवावा.
२. हिंसाचाराचे मानस तयार होईल अशी खेळणी मुलांसाठी घॆऊ व भेट देऊ नयेत.
३. पालकांनी वाचन संस्कृती वाढवावी व आपल्या भागात साने गुरुजी कथामाला सुरू करण्यात पुढाकार घ्यावा.
४. भोगवाद आणि हिंसाचार यांची दृष्ये / बातम्या टी.व्ही. तसेच पेपरातून प्रसिध्द करु नयेत.
५. कंपन्यांनी आपल्या जाहिरातीत भोगवादी व हिंसाचारी चित्रे देऊ नयेत.
६. हिंसाचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन झालेच पाहिजे.

जागतिक अहिंसा दिन

जागतिक अहिंसा दिन
संयुक्त राष्ट्र्संघाने २ ऑक्टोबर महत्मा गांधी जयंती हा जागतिक अहिंसा दिन पाळावा असे आवाहन केले आहे. त्यासाठी शाळाशाळांत खालील प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी घेतील असे योजावे.
प्रतिज्ञा
"हिंसाचार, भ्रष्टाचार य चंगळ्वाद या अपप्रवृत्तींपासून भारताला वाचविण्यासाठी साधेपणाने जीवन जगणे व शस्त्राचा वापर न करणे हे पथ्य मी पाळीन. ’एक बनो नेक बनो’ हा आजचा युगमंत्र आहे. जात, धर्म, वंश, लिंग आदि कुठ्ल्याही कारणावरुन भेदभाव व पक्षपात न करता मी सर्वांशी बंधुभावाने वागेन अशी प्रतिज्ञा आज महात्मा गांधी जयंती दिनी घेत आहे."

श्यामची AAi

साने गुरुजी च्या शामची आई पुस्तकावर संस्कार परीक्षा
साने गुरुजीं च्या मानवतावादी विचारांचा प्रचार करणारे चालते बॊलते सजीव स्मारक म्हणून "साने गुरुजी कथामाला" स्थापन झाली. या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाले च्या वतीने कित्येक वर्षापासून शामची आई पुस्तकावर संस्कार परीक्षा घेतली जाते. यंदा ही संस्कार परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात दोन विभागात घ्यावयाचे ठरविले आहे.
पहिला गट : इयत्ता ५ वी ते ७ वी - गुण ५०
दुसरा गट : इयत्ता ८ वी ते १० वी - गुण १००
पहिल्या गटासाठी ’चित्रमय शामची आई’ हे पुस्तक व दुसऱ्या गटासाठी ’शामची आई’ हे नेहमीचे पुस्तक यातून प्रश्नपत्रिका काढली जाईल.
परीक्षेसंबंधी महत्वाची माहीती -
१) ही परीक्षा डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी त्या त्या शाळेत संपन्न होईल.
२) किमान २५ विद्यार्थी ज्या शाळेतून बसतील अशाच शाळांना परीक्षा केंद्र देण्यात येईल.
३) पहिल्या १० विद्यार्थ्याना रोख बक्षिसे दिली जातील. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्याना प्रमाणपत्रे दिली जातील.