गुरुवार, 29 नवंबर 2007

साने गुरुजींच्या कविता - १
१. असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाहि पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतिल मोति मृत्तिकेवी
तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरि मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
२. बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो ॥धृ॥
हे कंकण करी बांधियले
जनसेवे जीवन दिधले
देशार्थ प्राण हे उरले
मी सिध्द मरायला हो ॥१॥
वैभवी देश चढवीन
स्वातंत्र्य त्यास अर्पीन
हा तिमीर घोर संहारिन
या बंधू सहाय्याला हो ॥२॥

शुक्रवार, 23 नवंबर 2007

साने गुरुजींच्या कवितांविषयी - २
साने गुरुजी सत्य, शिव, सुंदरतेचे उपासक होते. त्यांच्या मूल्यशिक्षणाच्या कल्पना त्याच वृत्तीतून साकारलेल्या आहेत. बालकांना गोष्टी सांगाव्या, चार चांगली भावपूर्ण गाणी म्हणावी, हा त्यांचा ध्यास होता. गावोगावी फिरताना गुरुजी बालकांच्या मेळाव्यात हरवून जायचे, त्यांना गोष्टी सांगायचे, मुलांकडून गाणी म्हणून घ्यायचे. उद्याची ही पिढी देशाच्या विकासात महत्वाची भूमिका वठवणार आहे, ही दूरदृष्टी गुरुजींजवळ होती. म्हणून लहान मुलांची भावनिक भूक भागवून त्यांच्या मनावर मातृधर्माचा आणि प्रेमधर्माबरोबरच देशभक्तीचा संस्कार गुरुजी करीत होते. एका श्रध्दाशील आत्म्याचा हा विधायक ध्यास होता.
हस रे माझ्या मुला
वारा वदे कानामध्ये
गीत गाइन तुला
ताप हरिन शांति देइन
हस रे माझ्या मुला ॥१॥
चिमणी येऊन नाचुन बागडुन
काय म्हणे मला
चिंवचिंव करिन चिंता हरिन
हस रे माझ्या मुला ॥२॥
हिरवे हिरवे डोले बरवे
झाड बोले मला
छाया देइन फळफूल देइन
हस रे माझ्या मुला ॥३॥
सुमन वदे मोठ्या मोदे
प्रेम देइन तुला
गंध देइन रंग दाविन
हस रे माझ्या मुला ॥४॥
रवी-शशी ताराराशी
दिव्य दाविन तुला
देइन प्रकाश बोले आकाश
हस रे माझ्या मुला ॥५॥
पाऊस पडेल पृथ्वि फुलेल
मेघ म्हणे मला
नद्या नाले बघशील भरले
हस रे माझ्या मुला ॥६॥
हिरवे हिरवे कोमल रवें
तृण म्हणे मला
माझ्यावरी शयन करी
हस रे माझ्या मुला ॥७॥
जेथे जाइन जेथे पाहिन
ऎकु ये मला
रडु नको रुसू नको
हस रे माझ्या मुला ॥८॥
पदोपदीं अश्रु काढी
कुणि न बोलला
सृष्टि तारी मंत्र उच्चारी
हस रे माझ्या मुला ॥९॥
माझ्या अश्रुंनो माझ्या मित्रांनो
खोलीमध्ये चला
दार घेऊ लावुन या तुम्ही धावुन
तुम्हिच हसवाल मला ॥१०॥

बुधवार, 21 नवंबर 2007

साने गुरुजीच्या कवितां बाबत - १

साने गुरुजींच्या कवितांविषयी - १
साने गुरूजींच्या कवितांचा समग्र विचार केला तर देवभक्ती आणि देशभक्तीने त्यांची कविता ऒतप्रॊत भरलेली आहे. सर्वत्र देवाच्या स्वरुपाचे दर्शन घेऊन जनी जनार्दन शोधण्याची त्यांची वृत्ती देशभक्तीपर्यंत जाऊन पोहोचते. म्हणूनच गांधीजींच्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी सन १९३० साली अमळनेरच्या आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. खानदेश ही त्यांची कर्मभूमी! या कर्मभूमीत त्यांनी गावोगावी भूमीगत कार्य करुन समाजप्रबोधनाचे आणि जनजागरणाचे काम केले. त्यांची धडपडणारी मुले गावागावात, समाजात प्राणवायू ओतण्याचे कार्य करीत होते. गुरुजींची गेय, भावकविता, गाणी म्हणत गावागावांत देशभक्तांची, तरुणांची पथके कार्यरत झाली होती.
’भारत माता माझी लावण्याची खाण’ अशी ही भावकविता ’स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई सुखवू प्रियतम भारत माई’ असा उदगार करत गावागावांत चैतन्य निर्माण करीत होती. इथला कष्टकरी "मजूर" हाच खरा देवाचा आणि देशाचा उपासक आहे, अशी प्रांजळ भावना गुरुजींच्या मनातून आपल्या कवितेव्दारे व्यक्त होत होती. "मानवता" हाच "खरा धर्म" आहे, असे ठामपणे आपल्या कवितेतून सांगणारा आधुनिक "संत" म्हणजेच साने गुरुजी.
सारा समाज सुखी आणि संपन्न व्हावा, कला विद्न्यानमय व्हावा हा ध्यास घेणारे गुरुजी आशावादी द्दष्टिकोनातून परमेश्वरास नमस्कार करतात. त्याच्या कृपेवा प्रसाद मिळावा म्हणून त्याची आळवणी करतात. या भक्तीच्या शक्तीने माणूस बलवान झाला की इंग्रजांना इथून सहज बाहेर काढता येईल आणि लोकशक्तीच्या रूपाने स्वातंत्र्य मिळ्वून आम्ही भारतमातेला सुखी करु. ही भावना गुरुजींच्या कवितेतून सर्वत्र दिसते.
मजूर
आम्ही देवाचे मजूर
आम्ही देशाचे मजूर
कष्ट करू भरपूर ॥धॄ॥
बाहेरिलही शेती करून
धनधान्याने तिला नटवुन
फुलांफळांनी तिला हसवुन
दुष्काळा करु दूर ॥१॥
हॄदयातिलही शेती करुन
स्नेहदयेचे मळे पिकवुन
समानता स्नेहाला निर्मुन
सौख्या आणू पूर ॥२॥
रोगराईला करूनी दूर
घाण सकळही करुनी दूर
स्वर्ग निर्मु तो या पृथ्वीवर
बदलू सारा नूर ॥३॥
दिवसभर असे कष्ट करून
जाऊ घामाघुम होऊन
रात्री भजनीं जाउ रमून
भक्तीचा धरू सूर ॥४॥
कर्मामध्ये दिव्यानंद
सेवेमध्ये दिव्यानंद
नाही अन्य फळांचा छंद
नाही काहि जरूर ॥५॥

मंगलवार, 20 नवंबर 2007

Sane guruji

जगातील वेगवेगळ्या देशांमध्वे उपजिवेकेसाठी वास्तव्य करीत असलेल्या मराठी भाषीकाना साने गुरूजींच्या जीवनाची, कार्याची, साहित्याची माहिती व्हावी. साने गुरूजी बद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सूकता निर्माण व्हावी. यासाठी ब्लाग व्दारे साने गुरूजींचे जीवन, कार्य, साहित्य, विचार याची माहिती उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करावा अशी कल्पना सूचली. म्हणुन हा प्रयत्न !
मुलांवर संस्कार करणारी माता ही आद्य गुरू मानली जाते, असे असले तरी स्वतंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्राला एक गुरूमाऊली लाभली ! ही मायमाऊली म्हणजेच मातृधर्मी साने गुरूजी ! विव्द्ता, सर्वस्वाचा त्याग, सेवापरायणता आणि ब्रम्हचारी राहून सर्व विश्वाच्या संसाराची चिंता वाहण्याची साधूवृत्ती हे महत्वाचे गुण त्यांच्या अंगी हॊते. गुरूजी म्हणायचे की मी "एक परार्धांश गांधीजींचा, एक परार्धांश रामकृष्णांचा आणि एक परार्धांश रवींद्रनाथ टागॊरांचा आहे." त्यांनी आपल्या जीवनात या तीन आदर्शांचा अंगिकार करुन सारे आयुष्य जनसेवा आणि देशसेवेसाठी वेचले. एक देशभक्त, सात्विक अंत:करणाचा, कवी हृदयाचा माणूस म्हणून गुरूजींचे व्यक्तिमत्व सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.
त्यांनी लिहीलेली एक प्रार्थना - खरा धर्म
खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे॥
जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे॥
सदा जे आर्त अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे । जगाला प्रेम अर्पावे॥
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे॥
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे॥
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे । जगाला प्रेम अर्पावे॥