साने गुरुजींच्या कवितांविषयी - २
साने गुरुजी सत्य, शिव, सुंदरतेचे उपासक होते. त्यांच्या मूल्यशिक्षणाच्या कल्पना त्याच वृत्तीतून साकारलेल्या आहेत. बालकांना गोष्टी सांगाव्या, चार चांगली भावपूर्ण गाणी म्हणावी, हा त्यांचा ध्यास होता. गावोगावी फिरताना गुरुजी बालकांच्या मेळाव्यात हरवून जायचे, त्यांना गोष्टी सांगायचे, मुलांकडून गाणी म्हणून घ्यायचे. उद्याची ही पिढी देशाच्या विकासात महत्वाची भूमिका वठवणार आहे, ही दूरदृष्टी गुरुजींजवळ होती. म्हणून लहान मुलांची भावनिक भूक भागवून त्यांच्या मनावर मातृधर्माचा आणि प्रेमधर्माबरोबरच देशभक्तीचा संस्कार गुरुजी करीत होते. एका श्रध्दाशील आत्म्याचा हा विधायक ध्यास होता.
हस रे माझ्या मुला
वारा वदे कानामध्ये
गीत गाइन तुला
ताप हरिन शांति देइन
हस रे माझ्या मुला ॥१॥
चिमणी येऊन नाचुन बागडुन
काय म्हणे मला
चिंवचिंव करिन चिंता हरिन
हस रे माझ्या मुला ॥२॥
हिरवे हिरवे डोले बरवे
झाड बोले मला
छाया देइन फळफूल देइन
हस रे माझ्या मुला ॥३॥
सुमन वदे मोठ्या मोदे
प्रेम देइन तुला
गंध देइन रंग दाविन
हस रे माझ्या मुला ॥४॥
रवी-शशी ताराराशी
दिव्य दाविन तुला
देइन प्रकाश बोले आकाश
हस रे माझ्या मुला ॥५॥
पाऊस पडेल पृथ्वि फुलेल
मेघ म्हणे मला
नद्या नाले बघशील भरले
हस रे माझ्या मुला ॥६॥
हिरवे हिरवे कोमल रवें
तृण म्हणे मला
माझ्यावरी शयन करी
हस रे माझ्या मुला ॥७॥
जेथे जाइन जेथे पाहिन
ऎकु ये मला
रडु नको रुसू नको
हस रे माझ्या मुला ॥८॥
पदोपदीं अश्रु काढी
कुणि न बोलला
सृष्टि तारी मंत्र उच्चारी
हस रे माझ्या मुला ॥९॥
माझ्या अश्रुंनो माझ्या मित्रांनो
खोलीमध्ये चला
दार घेऊ लावुन या तुम्ही धावुन
तुम्हिच हसवाल मला ॥१०॥
शुक्रवार, 23 नवंबर 2007
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
1 टिप्पणी:
Aaj kal angejike jamaneme haum log Sane guruji jaise mahan shikshak ko purnta bhul rahe hai. Agar yuva pidhipar acche Sanskar karneho to Sae guruji ka anusaran unki kavitaye aur stories sikhani aur sikhani chahiye.Sane Guruji spko senkdo pranam!!!!!!!
एक टिप्पणी भेजें