बुधवार, 21 नवंबर 2007

साने गुरुजीच्या कवितां बाबत - १

साने गुरुजींच्या कवितांविषयी - १
साने गुरूजींच्या कवितांचा समग्र विचार केला तर देवभक्ती आणि देशभक्तीने त्यांची कविता ऒतप्रॊत भरलेली आहे. सर्वत्र देवाच्या स्वरुपाचे दर्शन घेऊन जनी जनार्दन शोधण्याची त्यांची वृत्ती देशभक्तीपर्यंत जाऊन पोहोचते. म्हणूनच गांधीजींच्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी सन १९३० साली अमळनेरच्या आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. खानदेश ही त्यांची कर्मभूमी! या कर्मभूमीत त्यांनी गावोगावी भूमीगत कार्य करुन समाजप्रबोधनाचे आणि जनजागरणाचे काम केले. त्यांची धडपडणारी मुले गावागावात, समाजात प्राणवायू ओतण्याचे कार्य करीत होते. गुरुजींची गेय, भावकविता, गाणी म्हणत गावागावांत देशभक्तांची, तरुणांची पथके कार्यरत झाली होती.
’भारत माता माझी लावण्याची खाण’ अशी ही भावकविता ’स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई सुखवू प्रियतम भारत माई’ असा उदगार करत गावागावांत चैतन्य निर्माण करीत होती. इथला कष्टकरी "मजूर" हाच खरा देवाचा आणि देशाचा उपासक आहे, अशी प्रांजळ भावना गुरुजींच्या मनातून आपल्या कवितेव्दारे व्यक्त होत होती. "मानवता" हाच "खरा धर्म" आहे, असे ठामपणे आपल्या कवितेतून सांगणारा आधुनिक "संत" म्हणजेच साने गुरुजी.
सारा समाज सुखी आणि संपन्न व्हावा, कला विद्न्यानमय व्हावा हा ध्यास घेणारे गुरुजी आशावादी द्दष्टिकोनातून परमेश्वरास नमस्कार करतात. त्याच्या कृपेवा प्रसाद मिळावा म्हणून त्याची आळवणी करतात. या भक्तीच्या शक्तीने माणूस बलवान झाला की इंग्रजांना इथून सहज बाहेर काढता येईल आणि लोकशक्तीच्या रूपाने स्वातंत्र्य मिळ्वून आम्ही भारतमातेला सुखी करु. ही भावना गुरुजींच्या कवितेतून सर्वत्र दिसते.
मजूर
आम्ही देवाचे मजूर
आम्ही देशाचे मजूर
कष्ट करू भरपूर ॥धॄ॥
बाहेरिलही शेती करून
धनधान्याने तिला नटवुन
फुलांफळांनी तिला हसवुन
दुष्काळा करु दूर ॥१॥
हॄदयातिलही शेती करुन
स्नेहदयेचे मळे पिकवुन
समानता स्नेहाला निर्मुन
सौख्या आणू पूर ॥२॥
रोगराईला करूनी दूर
घाण सकळही करुनी दूर
स्वर्ग निर्मु तो या पृथ्वीवर
बदलू सारा नूर ॥३॥
दिवसभर असे कष्ट करून
जाऊ घामाघुम होऊन
रात्री भजनीं जाउ रमून
भक्तीचा धरू सूर ॥४॥
कर्मामध्ये दिव्यानंद
सेवेमध्ये दिव्यानंद
नाही अन्य फळांचा छंद
नाही काहि जरूर ॥५॥

कोई टिप्पणी नहीं: