शुक्रवार, 11 सितंबर 2009

नवी Aavhane

नवी आव्हाने
मुलांना गोष्टी सांगून त्यांचे भावविश्व समृध्द करणे हा गुरुजींचा आवडता छंद होता. त्यांच्या मृत्यूनंतर स्मारक करण्याऎवजी चैतन्यशक्ती चळवळीच्या रूपाने स्मारक साकारावे असे एका धडपडणाऱ्या मुलाला वाटले. १९५१ साली श्री. प्रकाशभाई मोहाडीकरांनी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा कथा सांगण्याचा कार्यक्रम अनेक शिक्षक नियमितपणे करू लागले. महाराष्ट्रातील पंधरा-वीस जिल्ह्यातील सुमारे चारशे प्राथमिक / माध्यमिक शाळांमध्ये या संघटनेच्या शाखा मुलामुलींच्या कथाकथनाच्या स्पर्धा होऊ लागल्या. संघटनेने सुरु केलेल्या कथाकथन प्रबोधिनीचे काम पुण्याच्या कार्यकर्त्यांनी चांगले चालवले आहे. नवनवे कथाकथनकार तयार करण्यासाठी शेकडोनी शिबिरे घेण्यात आली. कार्यकर्ते-शिक्षकांना उपयोगी पडतील अशी पुस्तके प्रकाशित करण्यात आली. "श्यामची आई" या पुस्तकावर आधारित परीक्षा घेण्याचा उपक्रम गेली काही वर्षे चालवला जात असून चार पाच हजार मुलेमुली त्यात आनंदाने भाग घेतात.
काथामाला संघटनेचे लोण गोव्यात केव्हाच पोहचले. तेथे राज्य पातळीवर नियमितपणे मुलामुलींच्या कथाकथन स्पर्धा घेतल्या जातात.
अन्य राज्यात कथामालेचे काम रुजावे यासाठी अनेक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. साने गुरुजींच्या अनेक पुस्तकांचा हिंदी अनुवाद स्वराज्य प्रकाशन दिल्ली यांनी प्रकाशित केला आहे. दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात काही शाखा चालत आहेत. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यातील काही कार्यकर्ते कथामालेचे काम त्यांच्या प्रादेशिक भाषांतून चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.
गेल्या काही वर्षात समाजजीवनात चंगळवाद थैमान घालू लागला आहे. मुलांनी एकमेकांचे मुडदे पाडणे, एकतर्फी प्रेमभंगाचे निमित्त सांगून रिंकू पाटील सारख्या कळ्या चुरगाळून टाकणे असले प्रकार वाढत चालले आहे. प्रसार माध्यमे हिंसाचार व भोगवादाला बेभानपणे उत्तेजन देत आहेत. या प्रवृत्तींचा मुकाबला करण्यासाठी शिक्षकांशी संवाद वाढवून त्यांची वैचारिक बैठक व सामाजिक बांधिलकी वाढवणे याकडे कथामाला विशेष लक्ष देऊ लागली आहे.
या संघटनेचे काम चारी दिशांनी वाढवण्यासाठी विविध साहित्य व साधने वापरली पाहिजेत. कार्यकर्त्यांनी दौरे काढून नवनवे शिक्षक जोडले पाहिजेत. परंतू हे सगळे करण्यासाठी संघटनेचा कायम निधी असणे आवश्यक आहे.ज्या सहॄदांना या कामाचे महत्व व आवश्यकता वाटत असेल तर आपल्या परिने मदत करावी. या आव्हानाला आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत . . . . . . . . . . . . . .
मदतीसाठी पत्ता -
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला
व्दारा- साने गुरुजी विद्यालय, भिकोबा वामन पाठारे मार्ग,
दादर (प.), मुंबई ४०००२८.
दूरध्वनी : (०२२) २४४४५९९६ / २४४५५९६९

कोई टिप्पणी नहीं: